Thursday, April 15, 2010

पारसिक चा किल्ला

मुम्ब्रा जवळचा पारसिकचा डोंगर बरेच दिवस चढायचं मनात होतं.पण योग यावा लागतो म्हणतात ना तसा तो जुळून आला.एप्रिल महिन्यात छोटा ट्रेक करायचं ठरलं.पहाटे निघून दुपारी घरी परत येता येइल असा.त्या दृष्टीने पारसिक उत्तम ट्रेक आहे.पहाटे ५.३० ल़ा निघून सगळी टीम मुम्ब्र्याला एकत्र जमली आणि ट्रेक चा श्रीगणेशा केला.सर्वप्रथम मुम्ब्रादेविचे दर्शन घेतले.मुम्ब्रा शहराचं दर्शन पहाटे प्रथमच घेत होतो.एका बाजूला धुक्यात हरवलेली उल्हास नदीची खाड़ी,दूर दिसणारे दिवा शहर,खाली वाहता रस्ता मुम्ब्रा बायपास आणि वरून बघता जमीन दिसणार नाही असे दाटीवटीचे मुम्ब्रा शहर....सगळे रम्य.सूर्योदय होता होता चढाईला सुरुवात केली.मुम्ब्रा कडून पारसिक चा डोंग चढायचा मार्ग आहे एका घळीतून .मुम्ब्रादेवी देवळाच्या पायऱया उतरून थोड़े ख़ाली उतरले की उजव्या हाताच्या दुसरया घळीतून वर जाण्याचा मार्ग आहे.हा मार्ग हड्सरच्या नळीच्या वाटेची आठवण करून देतो.दोन डोंगरांच्या मधे अडकलेल्या दगडांच्या कधी खालून कधी वरुन कधी लोकांच्या पायाचा खान्द्यांचा शिडिसरखा वापर करत वर पोहोचलो.वर पोहोचल्यावर उजव्या बाजुच्या डोंगरावर चढ़ाई केली.मुम्ब्रादेवी देवळाच्या बाजूला एक कातळभिंत आहे.गिर्यारोहक ही भिंत चढून ज्या ठिकाणी पोहोचतात तिथे एक झेंडा त्यानी विजयाचं प्रतिक म्हणू लावला आहे.त्या ठिकाणी पोहोचलो.या ठिकाणची ऊंची २०० मीटर म्हणजे ६०० फूट आहे.६०० फुटावरुन दिसणारे मुम्ब्रा शहर अणि परिसर अवर्णनीय.तिथे थोडावेळ थाम्बुन खाली उतरून पारसिक पिनॅकल च्या दिशेने कूच केले.थोडं जंगल थोड़ी मोकळी जगा अशा वाटेने हसत खिदळत रस्ता कधी संपला ते कळलच नाही आणि आम्ही एका महादेवाच्या देवळापाशी आलो.देवळाला भिंती नाहीत.नुकतेच कोणीतरी पूजा करून फुल वाहून गेलं होतं.तिथे थोडा वेळ थाम्बुन खालच्या अंगाला असलेल्या दुसरया एका घरापाशी आलो.इथे कोणीतरी रहात असावं.या घराच्या खालच्या बाजूला एक विहीर आहे.विहिरीतून पाणी काढायला दोरी आणि बादली आणली होती पण विहीर बरीच खोल असल्यामुळे दोरीला ओढ़णी बांधली आणि काम झालं.थंडगार पाणी तोंडावर मारून ताजेतवाने झालो आणि बरोबर आणलेल्या टोस्ट सँडविच आणि ताकावर ताव मारला.आता थोड़ी विश्रांति हवी होतीच त्यामुळे एका झाडाच्या सावलीत निद्राधीन झालो.थोड़े ताजेतवाने झाल्यावर उतरण्यासाठी कूच केले.पारसिक च्या पठारावरून कळव्यात उतरायला सोपा रस्ता आहे.पुढच्या वेळी त्या रस्त्याने उतरायचं नक्की केलं.थोड्या अंतरावर एक मारुतीची मूर्ति असलेली घुमटी लागली.त्याच्या पलिकडील बाजुस पारसिक बोगद्याच्या कलवा बाजूचे कलवा आणि ठाणे शहराचे दृश्य डोळ्यात साठवत पुढे झालो.पारसिक पिनॅकल च्या सोंडेवरुन मुम्ब्रा बायपास रोडवर उतरता येते.हा रस्ता थ्रिलिंग आहे.तो सावधानतेने पार करत एका कबरिपशी रोडवर उतरलो.

1 comment:

  1. खूप छान माहिती दिली किल्ल्यावर जायचं कस हे नाही सागितलं मला जायचं आहे 7506606510 my whatsapp number

    ReplyDelete