Tuesday, November 10, 2009

राजगड-दुसरा दिवस

रात्र भर ठंडी होती.पांघरुणातृन बाहेर निघताना बराच त्रास होत होता.पण इलाज नव्हता.आज पण बरच फिरायचं होतं.मस्त पैकी चहा बनवला.थोडं फार किडूक मिडुक खाऊन घेतलं आणि परत भटकंती ला सुरुवात केली.पाली दरवाजा एक ग्रुप फोटो काढून घेतला.

आज आम्हाला सुवेळा माची आणि बालेकिल्ला पहायचा होता.पटापट निघालो.वर आलो तो सूर्योदय झाला होता आणि सोनेरी प्रकाशाने बालेकिल्ला उजळला होता.बालेकिल्ल्याला जायच्या कडयातल्या पायऱ्या बघायची उत्सुकता होती आणि सुवेळा माचीताले नेढे सुद्धा.बालेकिल्ल्या कडे जाताना उजव्या हाताला सदर लागते ती मागे टाकुन बालेकिल्ल्याच्या डोंगराला भिडलो.बालेकिल्ल्याचा दरवाजा पद्मावती माचीच्या विरुद्ध बाजूला आहे.कड्याखालच्या रस्त्यावरून चालत राहिले की १५ ते २० मिनिटात आपण बालेकिल्ल्याच्या पायऱ्या आहेत तिथे पोहोचतो.या कड्यातल्या पायऱ्या चढायला खोबणी आहेत त्यांच्या आधाराने आपण महादारावाज्यात पोहोचतो.या हादारवाज्यात अफजल खानाचे मुंडके पुरले आहे आणि शिव काळात त्याची पूजा होत असे.त्या दरवाज्यात जयजयकार करत आत प्रवेश केला.उजव्या हाताला असलेल्या पायऱ्या वर चढून गेलं की उजव्या हाताला लागतं ते चंद्रतळं.राजगडावर ठिकठिकाणी पाण्याची इतकी सोय आहे की हे पाणी वर्षभर पुरते.इतके बांधकाम,तटबन्दी,बुरुज,टाकी,मंदिरे,दरवाजे,दिंड्या इतर कुठेही पाहायला मिळत नाही.तळे मागे टाकून पुढे गेलं की खाली उतरायला वाट दिसते आणि समोर दिसतो तो पद्मावती बुरुज आणि पद्मावती माची.या पद्मावती बुरुजाखाली एक गुहा आहे पण तिथे जाता येत नाही.बुरुजाखाली पहिले असता दोन्ही पाली दरवाजे,खालची वाट,समोर तोरणा आणि कानंदी नदीचे खोरे दिसते.परत मागे फिरलो आणि दक्षिण पश्चिम बुरुजापाशी पोहोचलो.इथून खाली संजीवनी माची दिसते.आणि डाव्या बाजूला सुवेळा आणि डुबा दिसतो.इथे सुद्धा काही अवशेष आणि महाराजांच्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात.या माथ्यावर पोहोचल्यावर स्वर्गावर स्वारी केल्यासारखे वाटते.एवढ्या उंचावर आल्यावर आजूबाजूचा एवढा थोरला परिसर दृष्टीक्षेपात येतो.४५०० हजार फुटावर आपण आहोत याचा अनुभव काही वेगळाच असतो.ह्या अनुभवाची शिदोरी घेत खाली उतरलो.आता सुवेळा माची कडे जायचं होतं.कड्यातल्या पायऱ्या उतरल्यावर उजव्या बाजूने सुवेळा माची कडे जाणारा रस्ता खाली उतरतो.राजगडाच्या या तिन्ही माच्या गडाचे वैभव आहे.आणि प्रत्येक माचीचं वेगळेपण हे मनाला भावतं.सुवेळा माची कडे जाताना डाव्या हाताला खाली उतरून गुजावाने दरवजा लागतो.तिथे जायला खाली उतरावे लागते.आता हा रस्ता वाहिवटीसाठी बंद करण्यात आला आहे.तो बघून आल्यावर सुवेळा माची कडे प्रस्थान केले.औरंगजेबाचा वेढा पडला होता तेव्हा त्याने सुवेळा माची पलीकडे तोफांसाठी धमधमे बांधले होते.सुवेळा माचीत एक सुंदर अशी गणपती ची मूर्ती स्थापन केली आहे.ती अप्रतिम आहे.तिथून पुढे गेलं असता डावीकडे दृष्टीस पडतं ते उंचावर असलेलं नेढ.ह्या निसर्गनिर्मित नेढ्यात जाऊन बसण्याचा आणि परिसर न्याहाळण्याचा आनंद काही अवर्णनियच.नेढयाचा कडा संपला की लागतो तो हत्ती प्रस्तर.वेळ कमी असल्यामुळे सुवेळा माची च्या टोकापर्यंत जाता आले नाही.परत यायचं तेव्हा ते फत्ते करायचं असं ठरवूनच जड अंत:करणाने गड उतरायला सुरुवात केली.........

No comments:

Post a Comment